लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी; म्हणाले “२१०० रुपये…”

Uddhav Thackeray | नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “आधी कोणतेही निकष लावले नाही, मग लाडकी बहीणचे पैसे देताना आता निकष का लावता? लाडक्या बहिणींना २१०० रुपये त्वरित द्या, ” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
लाडके-नावडते आमदार चर्चेत
उद्धव ठाकरे म्हणाले, “नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आहे. आपण आधी अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार पाहिलं. राज्यात आज जनतेच्या समस्या ऐकणारे सरकार नाही. हे सरकार जनतेच्या विश्वासाला तडा देत आहे. या निवडणुकीत निकाल अनाकलनीय लागला, जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात. या सरकारकडून नाईलाने जनता करत आहेत. विजयाचा आनंद दिसला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा रंगली आहे. मंत्रिपद ज्यांना मिळालं त्यापेक्षा नाराजांचे बार मोठ्याने वाजत आहे, लाडक्या बहिणींना न्याय देण्याऐवजी लाडके-नावडते आमदार चर्चेत आहेत.”
२१०० रूपये बहिणींच्या खात्यात जमा करा
“पहिल्या पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील पैसे वाटायला लागू नये यासाठी स्थगित आणली असं मला समजत आहे. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली आहे. महिलांची मते मिळवण्यासाठी जसं निवडणुकीच्याआधी ही योजना आणली गेली आणि पैसे दिले गेले, आता योजना तात्काळ सुरू केली पाहिजे. यामध्ये नावडती आणि आवडती करू नका. हे सगळे काही डाव होते ते आता उघडे झाले आहेत. आता निकष बाजूला ठेवून २१०० रूपये बहिणींच्या खात्यात जमा केले पाहिजे. पैसे देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. “एक प्रथा असते नवीन मंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय करून देत असतात. पण मला वाटतं पहिली वेळ असेल ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांचा मुख्यमंत्र्यांना राज्याचे मंत्री म्हणून परिचय करून द्यावा लागला, हे दुर्दैवी आहे. आम्ही २० आमदारांसह सरकारसमोर उभे आहोत. महायुतीला राक्षसी बहुमत असूनही अजून खातेवाटप करण्यात आले नाही. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावरही अधिवेशनात कोणताही मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाही,” असा आरोप ठाकरे यांनी केला.
अधिवेशनावर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, “जर खातेवाटपच झाले नाही, तर हे अधिवेशन कशासाठी आहे? अधिवेशन गमंत म्हणून सुरू असेल, तर ही गंभीर बाब आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत मला वाईट वाटते. या सरकारची अवस्था अत्यंत वाईट आहे.”
निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे
लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजत. मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाल्याशिवाय ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेवर पुढे जाणे योग्य ठरणार नाही. वन नेशन वन इलेक्शन हे विषय अदानीसारखे विषय बाजूला करण्यासाठी आहे. तुम्ही एका गावाची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला का घाबरता? लोकशाहीची प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे,” असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा:
मंत्रिपदानंतर राज्यात आता खाते वाटपात अडचण ? ; जाणून घ्या काय आहे संभाव्य फॉर्म्युला ?





