Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई महापालिका! शाखा प्रमुखांना दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना वेग दिला आहे. काहीजण मुंबई लुटायला आले आहेत. पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे. आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मिशन मुंबई महानगरपालिका सुरू केल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीणसाठी महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती.
त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे. आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा. तुम्हाला अजून देखील अनेक आमिषे येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेने लढा, असे सांगितले.



