मुंबई – उद्धव ठाकरे यांना दिल्लीत जाऊन मुख्यमंत्रिपदाबाबत आपले नाव पुढे करावे असे का वाटले ? लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी समाधानकारक नव्हती. त्यांनी विचारल्यास आम्ही निश्चित सांगू की, उमेदवार निवडीमध्ये काय चुका झाल्या.
त्यामुळे त्या चुका सुधारण्यासाठी त्यांना दिल्ली गाठावी लागली. ते करत असलेली मागणी मान्य होणार नाही, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
एका खासगी युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस जेव्हा निवडणुकीला सामोरे जाते तेव्हा काँगेस पक्ष कधीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करत नाही. मात्र सत्ताकाळात मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीत उतरले तर त्यांच्या नेतृत्वात ती निवडणूक लढविली जाते.
ही परंपरा आहे. निवडणूक झाल्यानंतर जो पक्ष मोठा त्याचा मुख्यमंत्री हे सरळ आहे. त्यामुळे यात काही बदल करावा लागेल, असे वाटत नाही, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.
जागा वाटपात एखादी जागा मागे-पुढे होत असते. लोकसभेला काही जागा त्यांनी हट्टाने मागून घेतल्या. त्याचा काही ठिकाणी फायदा झाला, मात्र विधानसभेत २८८ जागा असतात. त्यामुळे यात खूप काही बदल होईल असे वाटत नाही. सत्ता येणार असल्याचे दिसत आहे, त्यामुळे भरल्या ताटाला कुणी लाथ मारेल असे वाटत नसल्याचे चव्हाण यांनी बोलताना सांगितले.