Uddhav Thackeray vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेले मुख्य नेतेपद पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यासाठी त्यांनी आपला पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते यांना पणाला लावले, असा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज सुनावणीवेळी केला.
परंतु शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नागपूर येथे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे नार्वेकर यांनी आज नागपूर येथे सुट्टीच्या दिवशी सुनावणी घेतली. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांकडून तिसरे साक्षीदार खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी करण्यात आली.
तब्बल चार तास झालेल्या या सुनावणीत शिंदे गटाकडून 1998 ची शिवसेनेची घटना आपल्या कागदपत्रांसोबत जोडण्यात आली. याला ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. शिंदे गटाच्या वकिलांकडून 23 जून 2018 रोजी झालेल्या शिवसेनेच्या प्रातिनिधिक सभेवरच बोट ठेवण्यात आले.
आपल्या साक्षीत ही सभाच झाली नसल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला. याच सभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली असल्याने ठाकरे गटाच्या वकिलांनीही या मुद्द्यावर प्रश्न विचारत शेवाळे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.