Uddhav Thackeray vs Eknath Shinde – शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी नागपूर विधीमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांच्याकडून आजपासून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू झाली असून शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला.
अॅड देवदत्त कामत म्हणाले, आपण पिटीशन क्रमांक 1 ते 16 मध्ये जी साक्ष दिली ती आपण एकनाथ शिंदे यांच्या वतीने देत आहात की स्वतः देत आहात. यावर दिलीप लांडे म्हणाले, याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये माझे नाव नाही असे आपण मला सांगितले.
पण जी सत्य परिस्थिती लोकांसमोर आणि न्यायालयासमोर यावी यासाठी ही साक्ष मी देत आहेत. ही साक्ष मी एकनाथ शिंदे यांच्या वतीने नाही तर स्वतःच्या वतीने देत आहे, असा युक्ितवाद केला.
या सुनावणीवेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. तसेच ठाकरे गटाने घेतलेल्या आक्षेपावर साक्षीदार योग्य उत्तर देत नसल्याचा आरोप अॅड देवदत्त कामत यांनी केला. दरम्यान, ही सुनावणी उद्या सकाळी 8.30 वाजता सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे.