Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये; काळाराम मंदिरात करणार महाआरती

Uddhav Thackeray : अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिले आहेत. परंतु कॉँग्रेससह काही नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील सोहळ्याच्या दिवशी ठाकरे गटाने नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. आज 22 जानेवारीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अयोध्येत उपस्थित न राहता काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी आज सायंकाळी ५ वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती होणार आहे. त्यानंतर ते रामकुंडावर गोदा पूजन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराच्या प्रशासनाने देखील ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली आहे. यासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय मंदिरात कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आली आहे. महापूजा सुरू होण्यापूर्वीच मंदिरात भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे. साधारण अर्धा तास मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहेत.
राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका
तर दुसरीकडे, भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिर भेटीला विरोध करण्यात येत आहे. या संदर्भात भाजप आमदार राम कदम यांनी थेट मंदिराच्या पुजाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून कदम यांनी ठाकरे यांना मंदिरात येण्यापासून मंदिराच्या पुजाऱ्यांनी रोखावे, असे आवाहन केले आहे. ठाकरे यांना मंदिरात येण्याचा अधिकार आहे का? प्रभू रामचंद्रांना काल्पनिक आहे म्हणून पुरावे मागणाऱ्यांचे कान टोचावे. असे केले तरच त्यांना मंदिरात प्रवेश द्यावा. नाहीतर त्यांच्या प्रवेशानंतर गोमुत्र शिंपडून मंदिर शुद्ध करावे लागेल, असे राम कदम (Ram Kadam) यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.





