Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचं सूचक ट्विट! म्हणाले ही तर फक्त सुरुवात…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट आणि पत्रकार परिषदेद्वारे मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले. “मराठी माणूस एकवटताना दिसताच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. ही फक्त सुरुवात आहे, एकीचे बळ महाराष्ट्र पाहणार,” असे ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले.
मराठी माणसाच्या ताकदीपुढे सरकार नमले
पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी सांगितले की, “आज संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषिकांनी आंदोलन केले. मराठी भाषा समितीच्या आंदोलनात मी सहभागी झालो. मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची शक्ती हरली. सक्ती हरली. सरकारने अजब जीआर काढले, पण मराठी माणसाने त्याची होळी केली.” ठाकरे यांनी सरकारला मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “भाषेला विरोध नाही, पण सक्तीला विरोध आहे. सरकारला मराठी माणसात फूट पाडून अमराठी मते खेचायची होती, पण मराठी माणसाने समंजसपणा दाखवला.”
विजय मराठी माणसाचा, विजय मराठी भाषेचा! pic.twitter.com/na5luq4hdS
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 29, 2025
5 जुलैचा मोर्चा आता विजयी सभा
ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले, “मराठी माणसाची फूट लाभदायक ठरेल, असा सरकारचा अंदाज होता. पण आंदोलनाने मराठी माणूस एकवटला. ५ जुलैचा मोर्चा फोडण्याचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी झाला, म्हणून त्यांनी जीआर रद्द केले.” आता ५ जुलैला नियोजित मोर्चाचे विजयी जल्लोष सभेत रूपांतर होईल, अशी घोषणा ठाकरे यांनी केली. या सभेचे ठिकाण आणि तपशील लवकरच जाहीर केले जातील. ठाकरे यांनी मराठी जनतेला या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले, जेणेकरून मराठी अस्मितेची ताकद पुन्हा एकदा दाखवता येईल.




