Uddhav Thackeray : “ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, ते आमच्यावर…” वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “भाजपने पाळलेली बेडकं आज डराव डराव करतात. या चोरांना लाज-शरम ठेवली नाही. नॅपकिन आहे, ते तरी का ठेवलं?” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्यावरील प्रेम ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आणि तुम्हा सर्वांचा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘काय व्हायचं ते होईल, पण मी शिवाजी पार्कात सभा घेईन.’ मी तेव्हा माँसोबत समोर बसलो होतो. आज जे दाढी खाजवतात, ते तेव्हा कुठे होते माहीत नाही.” त्यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले, “ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, ते आमच्यावर टीका करतात. भाजपने कधी स्वतःचे नेते घडवले नाहीत. दुसऱ्यांच्या नेत्यांना मोठं करायचं आणि मग त्यांच्याच नावाने हिंदुत्व शिकवायचं. ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली, त्यांचाच पुतळा उभारणारा हा भाजपचा ढोंगीपणा आहे.”
भाजपच्या विश्वासघातावर बोलताना ठाकरे म्हणाले, “निवडणुकीत माता-भगिनींशी आणि जनतेशी केलेले वादे भाजप पाळत नाही. मग माझ्याशी केलेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा वादा कसा पाळतील? केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. मंदिराचं छत गळतं, विमान अपघात होतात, रेल्वे अपघात होतात, मेट्रोत पाणी भरतं. पण कोणी जबाबदारी घेत नाही.” त्यांनी केंद्र सरकारच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देशाला पंतप्रधानाची गरज आहे, भाजपच्या पंतप्रधानाची नाही. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शाहची नाही. देशाला संरक्षणमंत्र्याची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगाची नाही,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ठाकरेंनी काश्मीरमधील सुरक्षा स्थितीवरून सरकारला धारेवर धरले. “इंडिया आघाडी उभी केली, तर आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी केली. मग आम्ही जर मुजाहिद्दीनसारखे होतो, तर तुमच्या न केलेल्या शौर्याचं कौतुक जगभरात करायला आमच्या खासदारांना का पाठवलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आज देशाला खरे नेते हवेत, फक्त पक्षाचे घरफोडे करणारे नाहीत,” असे सांगत त्यांनी शिवसैनिकांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यात ठाकरे यांनी शिवसेनेच्या संघर्षमय इतिहासाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. “शिवसेना कधीच झुकली नाही, आणि यापुढेही झुकणार नाही. आम्ही सत्य कधी नाकारलं नाही. आता जनतेसोबत राहून या पाळीव बेडकांना उत्तर देऊ,” असे ते म्हणाले.





