Uddhav Thackeray : मोदी सरकार विरोधात ठाकरेंची शिवसेना मैदानात; उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानात गेल्या दोन दिवसांपासून 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली तरुणांनी पुकारलेले आंदोलन (Uddhav Thackeray) दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत चालले आहे.

Uddhav Thackeray : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानात गेल्या दोन दिवसांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली तरुणांनी पुकारलेले आंदोलन (Uddhav Thackeray) दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत चालले आहे.
आंदोलक तरुणांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून, आता विरोधी पक्षांतील बड्या नेत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेत तरुणांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वतः उद्या जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेणार असल्याने राजधानीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
काल सोमवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी अमानुष लाठीमार करून आंदोलकांना जंतरमंतरवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु या लाठीमारामुळे तरुण अधिकच चिडले आणि रात्रीच्या वेळी त्यांनी पुन्हा एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आज सकाळपासूनच आंदोलक अधिक आक्रमक पवित्र्यात मैदानात उतरल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे, मात्र आंदोलकांचा आक्रोश थांबण्याचे नाव घेत नाहीये.
आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी जंतरमंतरवर पोहोचून आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका करताना, “हे सरकार पूर्णपणे विद्यार्थी आणि तरुणविरोधी आहे,” असा थेट आरोप केला.
राऊत (Uddhav Thackeray) यांच्या या भेटीनंतर उद्या स्वतः उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल होणार असून ते आंदोलकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीच्या वेशीवर जाऊन उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात आणि सरकारवर कसा हल्लाबोल करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
तरुणांवर झालेल्या कारवाईनंतर देशभरातील विरोधी नेत्यांची जंतरमंतरवर रीघ लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासासमोर ठिय्या आंदोलन मांडले, ज्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापले.
त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही अभिजीत दीपके यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. संध्याकाळच्या सुमारास आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनस्थळी पोहोचून तरुणांना संबोधित केले आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.
विरोधी पक्षांची ही अभूतपूर्व एकजूट आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आगामी दिल्ली दौरा यामुळे जंतरमंतरवरील हे आंदोलन येत्या काळात केंद्र सरकारसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.






