मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार कालावधी आता संपला असून, शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी जोरदार प्रचारसभा घेतल्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतरही पाहायला मिळालं. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. गोरेगाव विभागातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे आणि त्यांची पत्नी, माजी नगरसेविका प्रमिला दिलीप शिंदे यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे उबाठा गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. शिवसेनेची ताकद वाढली दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदे यांचे शिवसेनेत स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे शिंदे गटाची मुंबईतील ताकद अधिक मजबूत झाल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंसमोर मुंबईची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुंबई महानगरपालिकेची सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय आठवले गट यांची महायुती मैदानात आहे. त्यामुळे 15 तारखेला होणाऱ्या मतदानात मुंबईकर कुणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.