दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – “….तर तुमच्यावरच बुमरँग होईल”

मुंबई – दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज, गुरुवार 20 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी प्रथमच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?
आमच्या घराण्याच्या सहा- सात पिढ्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही. पण राजकारण जर या वाईट दिशेला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल. दिशा सालियानच्या विषयात तथ्य नाही, दूर-दूर संबंध नाही. खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरँग होईल हेच या लोकांना मी सांगू इच्छितो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, नागपुरात सोमवारी जोरदार राडा झाला, दगडफेक झाली. जाळपोळ झाली. या घटनेत मोठं नुकसानं झालं. यावर प्रतिक्रिया देताना देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज सर्वप्रथम मी आरएसएसला धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता, त्यांनाच त्या थडग्यात गाडलं. आपण आता जे काही चाललंय राज्यात त्यावर न बोलता जुन्या कुठल्यातरी गोष्टीवर बोलत राहायचं त्याच्यावरून दंगली घडवायच्या याचा आता कंटाळा आला आहे, म्हणून मी आरएसएसला धन्यवाद देतो.
जेव्हा ही दंगल घडली त्या दंगलीमध्ये ज्याने महिला पोलिसांचा विनयभंग केला त्याचे हात आधी छाटले पाहिजे. त्यासोबतच जर कोणी दंगल भडकवली असेल तर त्याला सुद्धा कायद्याचा इंगा दाखवला पाहिजे. एकूणच काय हे सत्ताधारी आहेत ते ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत. मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय. आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. त्याचं कारण असं ज्या पद्धतीनं कामकाज रेटून नेलं जात आहे, हे लोकशाहीचं मूल्य पायदळी तुडवणारं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
दिशा सालियन यांचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी याला अपघात मानले होते, परंतु आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेत दावा केला आहे की, दिशावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत, त्या रात्री ते दिशाच्या घरी आयोजित पार्टीत उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अधिवेशनात गदारोळ –
आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हे प्रकरण गाजले. विधानसभेत भाजप आमदार अमित साटम यांनी SIT च्या तपासाचा अहवाल का आला नाही, यावर प्रश्न उपस्थित केला आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी केली. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी SIT ची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल सादर होईल, असे आश्वासन दिले. दुसरीकडे, विधान परिषदेत शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी हे प्रकरण CBI कडे सोपवण्याची मागणी केली, तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी चौकशीला पाठिंबा दिला.




