मुंबई : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन महिने उलटून गेले आहेत. पण, अजूनही या हल्ल्यातील प्रमुख आरोपी सापडलेले नाहीत. त्यातच सरकारने तीन हल्लेखोरांचे स्केच जारी केले. ते सगळे आता चुकीचे असल्याचे समोर आले आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण काहीतरी केले असे दाखवून देत सरकारने स्केच जारी केले. आणि ते तातडीने सोशल मीडियावर व्हायरलही केले. सरकारने तातडीने केलेल्या या हालचालींमुळे सरकारचे खूप कौतुकही झाले. या तीनही दहशतवाद्यांचे स्केच देशाबरोबरच जगभरातील प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले. या स्केचच्या आधारे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. मात्र, ही स्केच आता एनआयएने स्वतःच नाकारली आहेत. या स्केचनाच आधार मानत दोन महिने देशभरातील सुरक्षा यंत्रणा तीन दहशतवाद्यांना शोधत होती. परराष्ट्र मंत्र्यांनी देखील ही स्केच खरी असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही सांगितले होते. मात्र, त्यातील एकाचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचे आता समोर आले आहे. ही तर सरकारची मोठी फजिती आहे. अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकार चुकतेच कसे, असा सवालही ठाकरेसेनेच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. ही खरंच घाईघाईत केलेली कारवाई होती की सुरक्षा यंत्रणांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात आली होती? पहलगामसारखा हल्ला झाला तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर होत्या. त्यामुळे अशा पद्धतीने चुकीचे स्केच जारी करून सरकारने स्वतःची लाजच घालवलेली नाही तर देशाची प्रतिष्ठा देखील पणाला लावली असल्याची टीका करण्यात आली.