Uddhav Thackeray : देशात अघोषित एनआरसी लागू झाला का? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ झाला आहे. त्याबाबतचा निर्णय आला की नाही याची कल्पना नाही. मात्र स्वत:ची ओळख मतदारांनी पटवून द्यायची. म्हणजेच याचा अर्थ असा की, देशात अघोषित एनआरसी लागू झाला का? देशात जेव्हा सीएए आणि एनआरसी विषय गाजला होता, दिल्लीत त्याच्यावरून रान पेटले होते. साधारण त्यावेळी विषय हाच होता, तुम्ही तुमची ओळख पटवून द्या. त्यामुळे देशाता आता एनआरसी लागू झाला आहे का? याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
नवी दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका केली. बिहारमध्ये सध्या सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या घोळावरही त्यांनी भाष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, सीएए-एनआरसी अशाच पद्धतीने लागू करण्यात येणार होते. तसेच स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याने त्यांनी निवडणूक आयोगावर तोफ डागली. मग निवडणूक घेता कशाला? अशी विचारणा त्यांनी केली. मत कुणाला दिले जात आहे हे कळले पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे. यावर पंतप्रधान नरेद्र मोदी का गप्प आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांनी मोदी सरकारला निष्क्रिय, अपयशी आणि असहाय्य असे संबोधले. परराष्ट्र धोरणाबद्दल सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान आणि इतर मंत्री देशासाठी नव्हे, तर भाजपसाठी प्रचार मंत्री म्हणून काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.





