Uddhav Thackeray – ‘मी जर मुख्यमंत्री असतो तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करावेच लागले नसते’ असा टोला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी राज्य सरकारला लगावला आहे. तर सरकारला आता पेन्शन नव्हे टेन्शन देण्याची गरज आहे, असा हल्लबोलही त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील यशवंत मैदानात सुरु असलेल्या जुन्या पेन्शन आंदोलनाला भेट दिली. ठाकरे व्यासपीठावर येताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे २ दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. मंगळवारी, नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. आंदोलकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील सरकार हे केंद्राप्रमाणे केवळ आश्वासनाच्या रेवड्या देणारे सरकार आहे. पाच दिवसांचा आठवडा हा निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान मला माहिती आहे. या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. अच्छे दिन आले का? करोनानंतर ही जुनी पेन्शन योजना लागू करता येईल का नाही याबाबत चर्चा सुरूच झाली होती. मात्र गद्दारांनी गद्दारी करून आपले सरकार पाडले. आम्ही धोरण बनवतो, तुम्ही अंमलात आणता. हे अवैध सरकार आहे. तुम्ही तुमच्या हक्कासाठी आक्रोश करावा लागत आहे. निवडणूका येत आहेत, पुन्हा तुम्हाला फसवले जाईल, जसे २०१४ मध्ये फसवले होते, १५ लाख आले का? अच्छे दिन आले का? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. २०२४ साली आमचे सरकार येणार, आम्ही जुनी पेन्शन लागू करणार, एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली.