ठाकरेंची मोठी खेळी ! भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक निवडणूक लढवणार?

भायखळा : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच थेट सामना राज्यात होणार आहे. यादरम्यान सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना बहुतांश जागांवर होणार आहे.
यादरम्यान मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून मशालीवर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभा लढवण्यास इच्छुक असून सध्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत. यामिनी जाधव ह्या भायखळा मतदारसंघातून आमदार असून त्यांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आहेत. त्यामुळे, महायुतीमधील शिवसेना पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच, याठिकाणी ठाकरे गटाकडून आणखी पदाधिकारी देखील इच्छुक आहेत. मात्र, गीता गवळी यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. सध्या गीता गवळी या अखिल भारतीय सेना पक्षाच्या माजी नगरसेवक आहेत. बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आशा गवळी त्यासोबतच गीता गवळी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
जर गीता गवळी यांना ठाकरे गटाकडून विधानसभेचे तिकीट जाहीर झाले तर सध्याच्या भायखळा मतदार संघाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्यासाठी हि निवडणूक मोठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गीता गवळी यांना विधानसभेचे तिकीट जाहीर करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



