अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती काही थांबायचे नाही घेईना. नाशिक, पुणे, सिंधुदुर्गनंतर आता उद्धव ठाकरेंना अमरावतीमध्ये मोठा धक्का बसला आहे. ‘या’ नेत्याने सोडली साथ अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी तालुकाप्रमुख सुनील डिके यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराजी व्यक्त करत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. तालुक्यात आणि अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटात अनेक पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे तेथील निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले. त्यामुळे माजी तालुकाप्रमुखाने पदाधिकारी आणि शिवसैनिकांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. अमरावतीमध्ये स्थानिक आमदार ठाकरे गटाचा असूनही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.