उदयनिधी यांच्या बढतीची वेळ अद्याप यायचीयं; वडील स्टॅलिन यांचे संकेत

चेन्नई : तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे मंत्रिपुत्र उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यच्या मागणीने सत्तारूढ द्रमुकमध्ये जोर धरला आहे. मात्र, उदयनिधी यांच्या बढतीची वेळ अद्याप यायची आहे, असे संकेत खुद्द स्टॅलिन यांनी दिले. तामीळनाडूत एप्रिल २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारून सरकार स्थापन केले.
स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या यशात उदयनिधी यांची प्रचारमोहीमही कळीची ठरल्याचे मानले जाते. त्याचे बक्षीस म्हणून सरकार स्थापनेनंतर काही कालावधीनंतर उदयनिधी यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. सध्या ते क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. तामीळनाडूतील पुढील विधानसभा निवडणुकीला दोन वर्षांपेक्षा कमी अवधी राहिला आहे. त्या निवडणुकीचा विचार करून द्रमुकमधून उदयनिधी यांच्या बढतीची मागणी पुढे आली आहे.
उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री बनवल्यास आगामी निवडणुकीत द्रमुकची स्थिती आणखी भक्कम होईल, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्याविषयीचा प्रश्न सोमवारी पत्रकारांनी स्टॅलिन यांना विचारला. संबंधित मागणीने जोर धरल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्या मागणीवर विचार व्हायला अद्याप वेळ असल्याच्या आशयाचे उत्तर त्यांनी दिले.





