उदयनिधी यांना मिळणार बढती? उपमुख्यमंत्री बनवण्याची द्रमुकमधून मागणी

चेन्नई : तामीळनाडूतील सत्ताधारी द्रमुकमधून मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे उदयनिधी यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या चर्चांनी जोर धरला आहे. तामीळनाडूत एप्रिल २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली. त्या निवडणुकीत द्रमुकच्या प्रचारमोहिमेत उदयनिधी यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. ते स्वत:ही आमदार बनले. पक्षाच्या विजयातील हातभार विचारात घेऊन उदयनिधी यांना मंत्रिपदाचे बक्षीस देण्यात आले.
वडिलांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात उदयनिधी यांची दीड वर्षाने वर्णी लागली. राज्याचे मंत्री म्हणून ४७ वर्षीय उदयनिधी युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्रालयाची धुरा सांभाळत आहेत. तामीळनाडूतील पुढील विधानसभा निवडणुकीसाठी २ वर्षांपेक्षा कमी अवधी बाकी आहे. त्या निवडणुकीचा विचार करून द्रमुकच्या नेत्यांनी आतापासूनच उदयनिधींना बढती देण्याचा विषय लावून धरला आहे. त्यांना उपमुख्यमंत्री बनवल्यास पक्षाला मोठा राजकीय लाभ होईल, असे नेत्यांचे म्हणणे आहे.
अर्थात, उदयनिधी यांच्याविषयीची मागणी पुढे येण्याला एक पार्श्वभूमीही आहे. ७१ वर्षीय स्टॅलिन पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत राज्याची तात्पुरती धुरा उदयनिधी यांना सांभाळता यावी यासाठीच त्यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचे पद सोपवण्याचा विचार असावा. त्यासाठी ग्राऊंड तयार करण्याच्या उद्देशातून पक्षातूनच ती मागणी पुढे रेटण्याची रणनीती असावी, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. उदयनिधी यांना बढती मिळाल्यास तामीळनाडूत इतिहासाची पुनरावृत्ती होईल. याआधी एम.करूणानिधी मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र स्टॅलिन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.





