satara | उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्यावे

सातारा, (प्रतिनिधी)- खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयाने सातारा लोकसभा मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले आहे. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांना निर्णायक मताधिक्य दिले.
त्यामुळे उदयनराजे भोसले यांना केंद्रामध्ये तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान मंत्रिपद देण्यात यावे, अशा एकमुखी ठराव भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भाजपचे आढावा बैठक झाली. सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेण्याची जबाबदारी हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
त्यानुसार टिळेकर यांनी या बैठकीत आढावा घेतला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, अविनाश कदम इत्यादी उपस्थित होते. या बैठकीत सातारा लोकसभा अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
त्याचप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा आणि त्यांना केंद्रात चांगले मंत्रिपद मिळावे यासाठी ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला.
सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना मोठे मताधिक्य दिले. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यातही ठराव बैठकीत मंजूर झाला.
सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन योगेश टिळेकर यांनी त्यांची मते जाणून घेतली. तसेच वैयक्तिक मांडणीमधील विषयाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कोअर कमिटीकडे देणार असल्याचे सांगितले.
यावेळी सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, कराड उत्तरचे आणि विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, डॉ. प्रियाताई शिंदे, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, कराड दक्षिणचे निवडणूक प्रमुख धनंजय पाटील, कोरेगावचे विधानसभा निवडणूक प्रमुख भरत मुळे, विक्रमबाबा पाटणकर, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, सुवर्णा पाटील इत्यादी प्रमुख यावेळी उपस्थित होते.





