satara | उदयनराजे यांच्यासह लोकांचीही कॉलर टाइट!

सातारा, {श्रीकांत कात्रे} – सातारा लोकसभा मतदारसंघात अखेर अटीतटीच्या लढतीत उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली आणि भारतीय जनता पक्षाला सातारा मतदारसंघात पहिला विजय मिळवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यातील करिष्म्याला उदयनराजे यांनी धक्काच दिला. आणि गेल्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा भरुन काढला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असणाऱ्या उदयनराजे यांनी आपण लोकशाहीतील राजेच आहोत, हे सिद्ध करुन दाखवलं. आणि संसदेच्या मागच्या दारातून नव्हे तर पुढील दरवाजाने प्रवेश करण्याची जबरदस्त इच्छा त्यांनी साध्य केली. एक्झिट पोलमध्ये अपवाद वगळता सर्वच पोलमध्ये उदयनराजे यांचा पराभव दाखवत होते. मात्र, उदयनराजे यांनी आपला विजय नोंदवत एक्झिट पोललाच दणका दिला.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ही निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे उदयनराजे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागली. पण उमेदवारीची वाट पाहण्यात उदयनराजेंनी वेळ घालवला नाही.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला. खरं म्हणजे एका अर्थाने उदयनराजेंचा पुन्हा नव्याने संघर्ष सुरु झाला होता. पण थकतील ते उदयनराजे कसले? त्यांनी तिकीट मिळण्यापूर्वीच मतदारसंघ पिंजून काढला. अखेर पक्षाला उमेदवारी जाहीर करावी लागली. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती.
शशिकांत शिंदे यांनीही प्रचाराचा झंझावात सुरु केला. आरोप- प्रत्यारोप आणि टीकाटीपणींनी प्रचाराचा गदारोळ सुरू राहिला. उदयनराजे यांच्याविषयीचे नकारात्मक मुद्दे प्रचारात जोर करु लागले होते. विशेषतः निवडणुकीनंतर उदयनराजेंचा संपर्क नसतो, २५ वर्षे संधी देऊनही कोणतेही भरीव काम करता आले नाही.
असा अनेक प्रकारचा निगेटिव्ह प्रचार झाला. मात्र, या प्रचाराला लोकांनी थारा दिला नाही, हेच निकालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी केलेला संघर्ष, महायुतीच्या पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या आमदारांनी दिलेली साथ याचा एकत्रित परिणाम विजयात रुपांतर करुन गेला. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या मतदारसंघात उदयनराजेंविषयी मोठी नाराजी असल्याची चर्चाही होती.
त्यामुळे प्रचाराच्या काळात उदयनराजे यांनी हे मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढले. अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. शंभूराज देसाई, अतुल भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे या नेत्यांशी समन्वय साधत या तिन्ही मतदारसंघातीस परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.
शशिकांत शिंदे यांनीही खूप परिश्रम घेतले. त्यांच्यासाठी शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. पण पहिल्या तेरा फेऱ्यांमधून आघाडी मिळवणाऱ्या शिंदे यांच्या पदरात निराशाच पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून २००४, २००९, २०१४, २०१९ या चारही निवडणुकीत शरद पवार यांचा जिल्ह्यातील करिष्मा कायम राहिला. यापेकी २००९, २०१४, २०१९ या तिन्ही निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते.
मात्र, उदयनराजेंनी २०१९ च्या निवडणुकीनंतर लगेचच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. मात्र, भाजपने त्यांना राज्यसभेत खासदार केले.
या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत जिंकून पुढच्या दाराने संसदेत जाण्याची जिद्द उदयनराजे यांच्या मनात होती, त्या जिद्दीनेच उदयनराजे यांना विजयाचा मार्ग सोपा केला. लोकांनी पुन्हा एकदा उदयनराजे यांना संधी दिली आहे.
आता मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आणि उदयनराजे या अपेक्षांची पूर्ती करु शकतात, या विश्वासानेच लोकांनी पुन्हा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता केवळ उदयनराजेंचीच नव्हे तर लोकांचीही कॉलर टाइट झाली आहे…!





