#U19WorldCup | महिला टी-20 विश्वचषक 2025 चे वेळापत्रक जाहीर, गतविजेत्या टीम इंडियासमोर ‘या’ संघांचे असणार आव्हान…

U19 Women’s T20 World Cup 2025 : आयसीसी महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी ही स्पर्धा मलेशियामध्ये खेळवली जाणार आहे. गेल्या मोसमात भारताने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला हरवून जेतेपद पटकावले होते. आता पुढील वर्षी 18 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. यंदाच्या विश्वचषकातील खास गोष्ट म्हणजे यावेळी भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. भारताला ‘अ’ गटात तर पाकिस्तानला ‘ब’ गटात स्थान मिळाले आहे.
स्पर्धेत 16 संघ होणार सहभागी…
महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक 2025 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ प्रत्येकी तीन सामने खेळणार असून यामध्ये 41 लढती होणार आहेत. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-3 संघ सुपर-6 सिक्ससाठी पात्र ठरतील. सुपर सिक्ससाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी दोन्ही गटातील टाॅप 2 असे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. उपांत्य फेरीचा सामना 31 जानेवारीला तर अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
Tournament format for the ICC U19 Women’s T20 World Cup 2025 explained 📜#U19WorldCup | Fixtures ➡️ https://t.co/N5xqg2mCPZ pic.twitter.com/q8WsEzYrPa
— ICC (@ICC) August 18, 2024
गतविजेत्या टीम इंडियासमोर ‘या’ संघांचे असणार आव्हान…
मलेशियाच्या चार शहारात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. गत वेळी झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते. विजेत्या भारतासह वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि यजमान मलेशिया हे चार संघ एकाच गटामध्ये असणार आहेत. त्यामुळे ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघाला वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि मलेशियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. सन 2023 साली दक्षिण आफ्रिकेने या मालिकेचे यजमानपद भूषविले होते. ज्यामध्ये भारताने इंग्लंड संघाला 7 गडी राखून पराभूत करताना विजेतेपदाचा किताब पटकावला होता. यजमान मलेशिया व सामोआ हे संघ देखील प्रथमच या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
India’s🇮🇳 Group Stage Schedule for ICC U19 Women’s T20 World Cup 2025 in Malaysia!🏏🏆 pic.twitter.com/SzUq20Mw9Q
— CricketGully (@thecricketgully) August 18, 2024
16 संघांची चार गटात विभागणी
अ गट : भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका, मलेशिया
ब गट : इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका
गट क : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, सामोआ, आफ्रिकेतील पात्र संघ.
गट ड : ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, स्कॉटलंड, आशियातील पात्र संघ.
ही स्पर्धा होणार होती थायलंडमध्ये…
थायलंड देशाला या स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवायचे होते, पण आता थायलंडने यजमानपदावरून माघार घेतल्याने मलेशिया आता एकमेव यजमान आहे. यापूर्वी 2008 मध्ये मलेशियाने 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचेही आयोजन केले होते ज्यात विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, इमाद वसीम, रीझा हेंड्रिक्स, ट्रेंट बोल्ट, रवींद्र जडेजा यासारखे स्टार्स सहभागी झाले होते.





