Typhoon Matmo : चीनला मातमो चक्रिवादळाचा धोका; साडे 3 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

बँकॉक : मातमो हे चक्रिवादळ चीनच्या किनारपट्टीकडे सरकत असून चीन सरकारने खबरदारीची उपाययोजना म्हणून साडे ३ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिणेकडील ग्वांगडोंग आणि हैनान प्रांतातून या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. मातमो चक्रिवादळामुळे रविवारी सकाळी वाऱ्याचा वेग ताशी ११५ किमी इतका झाला असल्याचे चीनच्या राष्ट्रीय हवामानशास्त्र संस्थेने म्हटले आहे. हे रविवारी दुपारी वादळ ग्वांगडोंगमधील झानजियांग येथे थडकले असून प्रशासनाने सतर्कतेसाठी मध्यम स्वरुपाचा इशारा दिला आहे.
चक्रिवादळाच्या मार्गावर हैनान प्रांत येतो आहे. त्यामुळे या प्रांतातील विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली असून सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. तसेच सर्व उद्योग, व्यवसाय देखील शनिवारपासून बंद करण्यात आले आहेत. या प्रांतातील एक लाख ९७ हजार लोकांना हलवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. मातमो वादळ ग्वांगडोंग प्रांताच्या नैऋत्येकडील भागाला थेट धडकणार आहे. या भागातील दिड लाख लोकांना हलवण्यात आले आहे. वादळामुळे मोठ्या लाटा उसळू लागल्या असून समुद्राचे पाणी काही गावात घुसले आहे. त्याची दृश्ये स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत.
ग्वांगडोंग आणि हैनान प्रांतात १०० ते २४९ मिमी इतका पाऊस होण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मकाऊला जरी वादळाचा थेट धोका नसला तरी खराब हवामानामुळे सतर्कता म्हणून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. मातमो चक्रिवादळ या ठवड्याच्या सुरुवातीला फिलिपीन्सला धडकून गेले होते. मात्र वादळामुळे तेथे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वादळाचा फटका २ लाख २० हजार लोकांना बसला आहे. मोठ्या संख्येने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले होते. हे वादळ पुढे व्हिएतनाम आणि चीनच्या युनान प्रांताकडे सरकणार आहे.





