यवतमाळ – जिल्ह्यातील उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालय परिसरात डाॅक्टरवर गोळीबाराची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. हनुमंत धर्मकरे असे हल्यात जखमी झालेल्या डाॅक्टरांचे नाव आहे. याप्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत धर्मकारे हे दुपारी रुग्णालयातून घरी निघाले होते. रुग्णालयाच्या परिसरात आले असता अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या गोळीबारात धर्मकारे जखमी झाले असून त्यांना याच रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. धर्मकारे यांच्यावर गोळीबार का करण्यात आला याचा तपास पोलीस करत आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.