छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिद्धार्थ उद्यानात बुधवारी सायंकाळी भिंत कोसळून दोन महिला कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये स्वाती खैरनाथ (वय ३५, रांजणगाव) आणि रेखा गायकवाड (वय ३८, सौभाग्य चौक, हडको) यांचा समावेश आहे. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळ आणि पावसाच्या सरींमुळे उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, नूतनीकरण झालेल्या प्रवेशद्वाराचा हा भाग का कोसळला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरात अन्यत्र एक झाड कोसळल्याने एक महिला जखमी झाली. या दुर्घटनेनंतर महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणार का, याकडे लक्ष लागले आहे.