पालघर : पालघर जिल्ह्यात दोन महिलांना डेटिंग ॲप्सद्वारे पुरुषांना आमिष दाखवून आणि नंतर त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन लुटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोन्ही महिला आरोपींकडून ४ लाख रुपयांच्या चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघी ऑनलाइन डेटिंग ॲप्सद्वारे पुरुषांशी संपर्क साधायच्या, त्यांना भेटायच्या आणि नंतर त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन त्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरत असत. विरार पश्चिमेतील एका ३१ वर्षीय पुरूषाला २२ नोव्हेंबर रोजी एका लॉजमध्ये अशा प्रकारे लुटण्यात आले होते. त्याने २० ग्रॅमची सोन्याची साखळी, एक मोबाइल फोन आणि एक स्मार्ट घड्याळ चोरल्याचे पोलीसांना सांगितले. ज्यांची एकूण किंमत १.८३ लाख रुपये आहे. पकडले जाऊ नये म्हणून, महीला त्यांचे डेटिंग ॲप प्रोफाइल डिलीट करायच्या. लॉजवर अस्पष्ट ओळखपत्रे आणि चुकीचे फोन नंबर देत असत आणि ऑनलाइन पेमेंट करणे देखील टाळत असत. त्यांच्याविरुद्ध काशिमीरा पोलिस ठाण्यातही असाच एक गुन्हा दाखल आहे. आरोपींपैकी एक उत्तर मुंबईतील मालवणी येथील आहे, तर दुसरी हिमाचल प्रदेशची रहिवासी आहे.