“स्क्रॅप’च्या वापरातून दुचाकींसाठी वाहनतळ

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) स्वारगेट आगारात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत सुमारे 50 ट्रक स्क्रॅप गोळा झाला. या स्क्रॅपचा वापर करत पीएमपी कर्मचाऱ्यांनी दुचाकींसाठी वाहनतळ उभारले आहे. याशिवाय या मोहिमेमुळे आगाराचा परिसर स्वच्छ झाला असून, यामुळे बसेस पार्किंगसाठीदेखील जागा उपलब्ध झाली आहे.
पीएमपीच्या स्वारगेट आगारात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत बसेसचे खराब झालेले सुट्टे पार्टस, जुने बसस्टॉप आणि स्क्रॅप झालेल्या बसेस असे मिळून 50 ट्रक स्क्रॅप गोळा झाले होते. या मोहिमेमुळे आगाराचे आणि आवाराचे रुपदेखील पालटले आहे.
मोहिमेमुळे आगाराची जागादेखील वापरात येत असून, या ठिकाणी आता 30 ते 35 बस पार्किंग होत आहे. पूर्वी जागेअभावी या गाड्या रस्त्यावर उभ्या कराव्या लागत होत्या. त्यामुळे गाड्यांचेदेखील नुकसान होत होते.
याशिवाय आगारातील या साहित्यातून कर्मचाऱ्यांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठी सुमारे 140 बाय 24 फूट आकाराचे पार्किंग शेडही उभे राहिले आहे. यामध्ये सुमारे 250 दुचाकी उभ्या करण्याची क्षमता आहे. स्क्रॅप आणि त्यातून उभ्या राहिलेल्या पार्किंग शेडमुळे महामंडळाच्या सुमारे 10 लाख रुपयांची बचत झाली असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.





