काश्मीरात शोपियॉं जिल्ह्यातील चकमकीत जैशचे दोन दहशतवादी ठार

श्रीनगर – काश्मीरात शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए महंमदचे दोन गनिम ठार झाले. अबिद वागये आणि शहाजहॉं मिर अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. ते अनुक्रमे रावलपोरा आणि अमषेपोरा या भागातील रहिवासी असून त्या दोघांवरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दक्षिण काश्मीर मधील शोपियॉं जिल्ह्यात गहनाद भागात काही संशयीत दहशतवादी आश्रयाला आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या भागाला वेढा देऊन शोध मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत हे दोन जण ठार झाले आहेत. हे दोन्ही दहशतवादी जैश ए महंमदचे सक्रिय हस्तक असल्याचे त्यांच्या नोंदीवरून आढळून आले आहे. काश्मीरातील काहीं महत्वाच्या हत्या प्रकरणात या दहशतवाद्यांचा हात होता. त्यात प्रामुख्याने बादगंद येथील फिरदोस अहमद आणि काप्रान येथील निसार अहमद यांच्या हत्येत त्यांचा हात होता असा पोलिसांचा दावा आहे. गेल्यावर्षी बातगंद येथे बलवंत सिंग नावाच्या एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली होती. तीही त्यांनीच केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या खेरीजही अन्य काही हत्या प्रकरणे त्यांच्या नावावर आहेत. याच जिल्ह्यातील एका चौकीवर हल्ला करून चार पोलिसांची हत्या करण्याचा तसेच त्यांच्याकडील शस्त्रे पळवून नेल्याचा प्रकार घडला होता त्याचा प्रमुख सूत्रधशर शहाजहॉं मिर हाच होता असाही पोलिसांचा दावा आहे.





