Rajgurunagar Crime News : दोन सख्या बहिणींचे हत्या प्रकरणः भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांकडून आरोपीला फाशी देण्याची मागणी

राजगुरूनगरः कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन बहिनींपैकी एकीवर अत्याचार करून त्या दोघींची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजगुरूनगर पोलिसांनी अजय दास (वय ५४, पश्चिम बंगाल) या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचा एनकॅान्टर करावा, अन्यथा त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि. २५ डिसेंबर रोजी राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस १३५ कायद्याप्रमाणे दोन मुली बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीनुसार सदर मुलींचा शोध पोलिसांकडून सुरू होता. मंगळवारी रात्री बेपत्ता असणाऱ्या दोन्ही मुलींचे मृतदेह त्या राहत असलेल्या घराच्यावर असलेल्या भाडेकरुंच्या खोलीत असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने सदर गुन्हा केल्याचे कुबूल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लैंगिक अत्याचार करून खून
या घटनेचे तीव्र स्वरुपाचे पडसाद राजगुरूनगरसह जिल्ह्यात उमटले आहेत. मयत असणाऱ्या दोन्ही सख्या बहिणी होत्या. त्यापैकी एकीवर नराधम अजय दास याने लैंगिक अत्याचार करून पाण्याच्या टाकीत बडवून हत्या त्यांची केली. आतापर्यंतच्या तपासात एका मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणावर आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, मला या घटनेची माहिती आज पहाटे मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क केला. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. पाशवी विचारप्रववृत्तीची लोकं असू शकतात, या गोष्टीबद्दल खूप खेद वाटतो. लहान मुलांवर अशा प्रकारे अत्याचार आणि हत्या होणे हे दुर्देवी आहे. या प्रकरणात आरोपीसोबत अन्य त्याचे साथीदार असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार त्याच्या साथीदारांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.
पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पोलिसांमार्फत याविषयी जनजागृती सुरू आहे. भाडेकरुंची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे. यापूर्वी आम्ही घरमालकांना माहिती देण्यासंदर्भात नोटीसा दिल्या आहेत. येथून पुढे जे ही माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच घर भाड्याने देत असताना घरमालकाने संबंधितांची शहानिशा करूनच खोली भाड्याने द्यावी
रमेश चोपडे (अप्पर अधिक्षक)
आमच्या भटक्या विमुक्त समाजातील दोन बहिणी खेळत असताना अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. तसेच त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकले. महाराष्ट्र आणि खेडमध्ये हैद्राबाद पॅटर्न राबवावा. तोपर्यंत हा भटका विमुक्त समाज मागे हटणार नाही. अशा प्रकारच्या एक लाख केसेसमध्ये आहेत. अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही. भटक्या विमुक्त समाजातील लोकांना अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण भेटावे. यासाठी सरकारने समिती नेमायला हवी.
संजय कदम ( राज्य अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती)
आमच्या तालुक्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली आहे. त्याच्यासोबत असलेले जे चार लोक आहेत. त्यांची देखील पोलिसांनी कसून चौकशी करावी. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडित कुटुंबाला १ कोटी रुपयांची मदत प्रशासनाने करावी. या तालुक्यातील आमदार तसेच खासदारांनी पीडित कुटुंबाला भेट द्यावी.
विजय डोळस (अध्यक्ष भीमशक्ती संघटना पुणे जिल्हा)





