नवी दिल्ली – देशात करोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गोव्यानंतर आणखी दोन राज्य करोनामुक्त झाली आहेत. गोवा देशातील ग्रीन झोन ठरणारे पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर आता मनिपूर आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांनी करोना व्हायरसच्या विळख्यातून सुटका केली आहे. एकीकडे करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना गोवा, त्रिपुरा आणि मनिपुर राज्याने मात्र करोनावर मात केली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी ट्विट करत राज्य करोनामुक्त झाल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्रिपुरात करोनाचे दोन रुग्ण होते. हे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता करोनमुक्त झाले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी याविषयी माहिती देताना, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस दल आणि सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्रिपुराआधी गोवा आणि मनिपुरही करोनामुक्त झाले आहे. मनिपुरमधील दोन्ही करोना रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हे राज्य करोनामुक्त झाले होते. तर याआधीच गोवाही करोनामुक्त झाले आहे. गोवा हे करोनामुक्त होणारे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या सहा हजारांकडे गेली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत या तिन्ही राज्या करोनाचे रूग्ण मोजकेच असले तरीही आता या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णाची संख्या शून्यावर आहे.