लोणावळा – येथील नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणखी दोन जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या कंपनीमधील करोना पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांची संख्या आता तीन झाली आहे.
याशिवाय या कंपनीकडून त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या अन्य 99 कामगारांची शुक्रवारी (दि. 10) तपासणी करण्यात आली. त्यातील 5 जणांचे स्वॅब संशयित म्हणून करोना तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणारी एक व्यक्ती 7 जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर या कंपनीमधील या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकूण चार जणांचे स्वॅब “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’ तपासणीसाठी घेण्यात आले होते.
त्यातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नांगरगावमध्ये राहणाऱ्या या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील तीन जणांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण 8 जणांचे स्वॅब शुक्रवारी तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.