पिंपरी – स्टील व्यावसायिकांना बनावट कंपनीचे कागदपत्र दाखवून लाखो रुपयांचे स्टील खरेदी केले. त्यानंतर व्यावसायिकाला पैसे न देता त्याची 38 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक केली आहे.
दिपक किशोरीलाल गुजराल (वय 32, रा. आदिनाथ नगर, आर्यन हाईटस भोसरी), विजयकुमार हरिराम विश्वकर्मा (वय 45, रा. फ्लॅट नं. 707, बंन्सल सिटी, दिघी रोड, भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
टोळीचा म्होरक्या हरीष राजपूत आणि त्याचा साथीदार सागर पारेख अद्याप फरार आहेत. परशुराम साहेबराव भोसुरे (वय 50, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी खोट्या कंपनीचे नाव सांगून तसेच खोटी कागदपत्रे दाखवून भोसुरे यांच्याकडून 38 लाख 15 हजार 211 रुपये किमतीचे स्टील शीट विकत घेतले. स्टील घेतल्यानंतर पैसे न देता फसवणूक केली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी दीपक आणि विजयकुमार या दोघांबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहायक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक एम. बी. गाढवे, कर्मचारी अजय डगळे, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, सागर जाधव, गणेश हिंगे, समीर रासकर, संतोष महाडीक, सुमीत देवकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अशी करायचे फसवणूक
हरीष राजपूत व सागर पारेख हे इंडिया मार्ट या वेबसाइटवरून स्टील व्यवसायीकांशी संपर्क साधत. विजय विश्वकर्मा याचे नावे असलेल्या विश्वकर्मा ब्रदर्स या फर्मचे नाव व कागदपत्रे वापरून व पुढील तारखेचा चेक देऊन स्टील खरेदी करत असत. त्यानंतर एखादी बंद असलेली स्टील कंपनी त्यांच्या मालकीची आहे, असे सांगून त्या कंपनीच्या समोर खाली करून घेत. पुढे ते त्या ठिकाणावरून स्टील दुसरीकडे विक्रीसाठी घेऊन जात. या आरोपींवर रायपूर, छत्तीसगड येथे एक, इंदौर, मध्यप्रदेश येथे एक, मुंबईमध्ये दोन, तेलंगणा राज्यात एक असे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून 38 लाख 15 हजार 211 रुपये किमतीची स्टील जप्त करण्यात आले आहे.