पुणे -कासेवाडी तसेच लोहियानगर भागात गोवरची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे या भागातील एक ते पाच वर्षे वयोगटातील सुमारे 1 हजार 751 मुलांना गोवरची लस प्रतिबंधात्माक उपाय योजना म्हणून दिली जाणार आहे. या मुलांनी यापूर्वी हा डोस घेतलेला असला तरी दिला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये गोवरची साथ पसरल्याने अनेक मुले आजारी पडत आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये मुलांना प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून वारंवार लसीकरणाचा व उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, मागील आठवड्यात लोहियानगर परिसरात एकाच भागात दोन गोवरबाधित रुग्ण आढळले असून, कासेवाडी परिसरात एक बाधित तर त्याच परिसरात तीन ते चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अरोग्य विभागाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून 10 पथकांची नेमणूक करून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. लोहियानगर येथील चार वर्षांच्या आणि कासेवाडीतील दहा वर्षांच्या बालकाला गोवरची लागण झाल्याचे आढळून आले. चार वर्षांच्या मुलाने गोवरची एकही लस घेतलेली नव्हती, तर दहा वर्षांच्या मुलाबद्दल पालक संभ्रमात होते. हे दोघे एकाच भागातील असल्याने हा परिसरात गोवरची साथ जाहीर केली आहे. 529 बालकांना लस या भागात महापालिकेने काही दिवसांपूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून एक ते पाच वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले होते. त्यात या भागात एक ते पाच वयोगटांतील सुमारे 1751 बालके आढळून आली होती. मात्र, आता ज्यांनी यापूर्वी लस घेतली असो किंवा नसो तरीही महापालिकेने या सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. आत्तापर्यंत 529 बालकांना लस देण्यात आली आहे. उर्वरित बालकांचे लसीकरण पुढील पाच दिवसांत लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याचे डॉ. भारती यांनी स्पष्ट केले.