सातारा – जिल्ह्यात एका करोनाबाधितासह दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 106 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान शुकवारी रात्री तीन जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 891 झाली आहे.
या तीन बाधितांमध्ये पाटणमधील कुंभारगावचा 42 वर्षीय पुरुष, खटाव येथील 50 वर्षीय महिला तर मलकापूरमधील खंडोबानगर येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे. गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त रिपोर्टनुसार कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील 70 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 62 वर्षीय पुरुषाला सारीची लक्षणे असल्याने गुरूवारी दाखल करुन नमुना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला. त्याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पुण्यातील एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजकडून 106 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, गुरूवारी रात्री जिल्ह्यातील 22 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
या 22 जणांमध्ये कराड तालुक्यातील उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगांव येथील 53, 28 व 58 वर्षीय महिला, वडगाव येथील 55 वर्षीय महिला, चचेगाव येथील 45 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष, कोरेगांव तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षाचा मुलगा व 14 वर्षाची मुलगी, करंजखोप येथील 40 व 62 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, फलटण शहरातील रविवार पेठेतील 68, 25, 62 व 60 वर्षीय महिला, सोमवार पेठेतील 35 वर्षीय पुरुष तर फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील सुरुर येथील 50 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुष आणि पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 72, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 32, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 55, वाईच्या उपजिल्हा रुग्णालयातील 7, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 5, शिरवळ करोना केअर सेंटरमधील 7, रायगाव येथील 10, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 39 अशा एकूण 248 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत.
दहा जण करोनामुक्त
विविध रुग्णालयात तसेच करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन करोनातून बऱ्या झालेल्या 10 जणांना शुक्रवारी 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. बरे होऊन घरी सोडलेल्यांमध्ये पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील 31 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील वडगाव येथील 57 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील 50 वर्षीय पुरुष, पिंपळवाडी-धावडशी येथील 36 वर्षीय महिला, सातारा शहरातील रविवार पेठेतील 14 वर्षीय युवती, शाहूनगर (सातारा) येथील 50 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवती, फलटण तालुक्यातील तांबवे येथील 40 वर्षीय पुरुष, वडले ता. फलटण येथील 45 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.