धेनकनाल: ओडिशात प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे एक विमान कोसळून त्यात दोन जण ठार झाले. हे विमान धेनकनाल जिल्ह्यात कोसळले. त्यात ट्रेनी पायलट आणि त्याचा प्रशिक्षक ठार झाला. सरकारी विमान प्रशिक्षण संस्थेच्या बिरसाला येथील आवारातच हे विमान कोसळले. या अपघाताच्या चौकशीचे काम सुरू आहे. चौकशीनंतरच ही दुर्घटना नेमकी कशी झाली ते कळेल. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडातून ही दुर्घटना झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ठार झालेल्या दोघांची ओळख पटली आहे. विमान कोणत्या जातीचे होते याची माहिती मात्र अजून मिळालेली नाही. हे विमान संस्थेच्या धावपट्टीच्या आवारातच कोसळल्याने विमान पडून जमिनीवरील कोणाचेही नुकसान झालेले नाही.