प्रभात वृत्तसेवा खेड-शिवापूर – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वेळू फाटा येथे मंगळवारी (30 जुलै) सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा वाहनांचा चुराडा झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये प्रथमेश महादेव रेडेकर (३२, रा. सांगली) आणि दिव्यम सुनील निकम (३१, रा. धुळे) यांचा समावेश आहे. तर, पिकअप चालक संजय श्रीरंग खाटपे (42, रा. हिंगेवाठार, ता. भोर) हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सातार्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा ट्रेलर (क्रमांक एमएच-०४-केयू-११४४) चालकाचा ताबा सुटल्याने वेळू गाव हद्दीत ससेवाडी पुलाजवळील दुभाजकावर आदळला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की ट्रेलरने दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या मुंबई दिशेच्या लेनमध्ये शिरला. पिकअप (एमएच-१२-जेएफ-५२८८), तीन दुचाकी (एमएच-१८-बीबी-३९९९, एमएच-१०-डीएक्स-५६९४, एमएच-१२-एमवाय-१४५५) आणि एक कंटेनर (एचआर-५५-एपी-३३५६) या वाहनांना ट्रेलरने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेमुळे महामार्गावर काही काळ गोंधळ उडाला. अपघाताचे ठिकाण वोम कंपनीसमोर असल्याने तेथील सुरक्षा रक्षक आणि कामगारांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या सर्वांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, या अपघातात गंभीर जखमी झालेले प्रथमेश महादेव रेडेकर (३२, रा. सांगली) आणि दिव्यम सुनील निकम (३१, रा. धुळे) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. इतर चौघां जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघात घडल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने महामार्ग सुरक्षा पथक व राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी तेथे दाखल झाले. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. शिंदेवाडी पोलीस चौकीचे एपीआय तुकाराम राठोड, यांच्यासह पोलीस कर्मचारी सागर गायकवाड, हगवणे, जाधव, कांबळे आणि कदम यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. काही वेळ वाहतूक कोंडी… अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंना लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक वळविली आणि काही तासांतच रस्त्यावरील परिस्थिती पूर्ववत केली. तरीही सकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे शेकडो वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.