Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोची धडक होऊन भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूरमधून एक अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कार आणि ऑटोची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातल्या येन्सा या ठिकाणी ही भीषण अपघाताची घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातील येन्सा परिसरामध्ये घडला आहे. रामपूर येथील काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोऱ्याला जात असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत.
या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त सर्व मजूर हे वरोरा येथील रहिवासी असून ते मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते. काम संपवून परतत असताना त्यांच्या रिक्षाला कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.





