पुणे – पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडू विजापूर येथे कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी गेले असता त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या घटनेमध्ये 2 जण ठार झाले असून 2 जण गंभीर आहेत.
बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कबड्डीपटूंच्या तवेरा गाडीला अपघात झाला असून त्यामध्ये २ कबड्डीपट्टू यांचा जागीच मृत्यू झाला. सोहेल सय्यद (वय २२) व महादेव आवटे (वय २०) अशी मृत झालेल्या कबड्डीपटूंची नावं आहेत. अपघातात जखमी सर्व खेळाडूंना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटकातील विजापूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेडग येथे आज कबड्डीचे राष्ट्रीय राज्यस्तरीय सामने खेळले जाणार होते. या सामन्यांसाठी इंदापूर तालुक्यातील कळम व वालचंदनगर, भवानीनगर व आसपासच्या कबड्डी खेळाडूंचा समावेश असलेला महाराणा संघ सहभागी होणार होता, यासाठी सर्व खेळाडू विजापूरला जाण्यास निघाले होते.
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघाच्या गाडीला विजापूर येथे अपघात होऊन सोहेल सय्यद व महादेव आवटे या दोन गुणी कबड्डीपटूंचा मृत्यू झाला.तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना दुःखद आहे. या खेळाडूंच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) March 17, 2021
अपघातात ठार झालेल्या कबड्डीपटूंविषयी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. मृत खेळाडूंच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.