श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. ते जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य आहेत. दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बारामुल्ला जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे पिस्तुल आणि चीनी बनावटीच्या ग्रेनेडचा साठा आढळला. प्राथमिक चौकशीवेळी त्यांनी जैशचे सदस्य असल्याची कबुली दिली. आता अटकेनंतर त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यातून जैशच्या नापाक मनसुब्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट जैशने रचल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांत जैशचे काही दहशतवादी सुरक्षा दलांच्या मोहिमांमध्ये मारले गेले. अशात त्या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांची अटक सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.