Strait of Hormuz: 48 तासांत दोन भारतीय जहाजांवर इराणकडून गोळीबार; हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास कठीण
Strait of Hormuz: या हल्ल्यामुळे ही दोन्ही जहाजे मार्ग सोडून पुन्हा इराणच्या आखातात (पर्शियन गल्फ) परतली आहेत.

Strait of Hormuz: पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे सध्या हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करणे मालवाहू जहाजांसाठी अत्यंत जिकिरीचे झाले आहे. गेल्या ४८ तासांत हॉर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर इराणकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यामुळे ही दोन्ही जहाजे मार्ग सोडून पुन्हा इराणच्या आखातात (पर्शियन गल्फ) परतली आहेत. बंदरे आणि जहाजबांधणी मंत्रालयाचे संचालक मनदीप सिंह रंधावा यांनी सोमवारी या घटनेला दुजोरा दिला असून, सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे.
#WATCH | Delhi | Director in the Ministry of Ports, Shipping & Waterways Mandeep Singh Randhawa says, “In the past 48 hours, 2 Indian vessels reported a firing incident while transiting Strait of Hormuz, following which, they returned to the Persian Gulf. No injury to the crew… pic.twitter.com/cgqI5saStj
— ANI (@ANI) April 20, 2026
इराणच्या आखातात भारताच्या मालकीची एकूण १४ जहाजे –
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘समनार हेराड’ नावाचे तेलवाहू जहाज आणि ‘जग अर्नव’ हे बल्क कॅरिअर हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. सुदैवाने, या हल्ल्यात चालक दलातील कोणत्याही सदस्याला दुखापत झालेली नाही. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन्ही जहाजांच्या कप्तानांनी सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेत पुन्हा आखाताचा रस्ता धरला.
या घटनेनंतर सागरी हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘मरीन ट्रॅफिक’ पोर्टलनुसार, ‘देश वैभव’ आणि ‘देश विभोर’ या अन्य दोन जहाजांनीही आपला मार्ग बदलला आहे. सध्या इराणच्या आखातात भारताच्या मालकीची एकूण १४ जहाजे अडकली आहेत.
‘देश गरिमा’ सुरक्षितपणे हॉर्मुझ सामुद्रधुनी पार –
एकीकडे गोळीबाराच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण असतानाच, कच्च्या तेलाने भरलेले भारतीय टँकर ‘देश गरिमा’ सुरक्षितपणे हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी ठरले आहे. ३१ भारतीय खलाशी असलेल्या या जहाजाचे २२ एप्रिल रोजी मुंबईत आगमन अपेक्षित आहे.
मार्च महिन्यापासून हॉर्मुझचा मार्ग यशस्वीपणे ओलांडणारे हे १० वे भारतीय जहाज ठरले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आत्तापर्यंत २,५६३ हून अधिक भारतीय खलाशांना तिथून सुरक्षित बाहेर काढले असून, गेल्या २४ तासांत २५ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारताच्या परराष्ट्र सचिवांनी नवी दिल्लीतील इराणच्या राजदूतांना पाचारण करून या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील व्यावसायिक जहाजे आणि नाविक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे भारताने इराणला ठणकावून सांगितले आहे. सध्याच्या युद्धसदृश परिस्थितीमुळे या व्यापारी मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.





