दहशतवाद वाढण्यास दोन घटना जबाबदार; अब्दुल्ला यांचे मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

जम्मू : अपहरणाच्या दोन घटनांत दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद वाढण्यास त्या घटना जबाबदार आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीरमधील सभेत बोलताना मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली.
नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेस आणि पीडीपी हे पक्ष जम्मू-काश्मीर उद्धवस्त होण्यास जबाबदार आहेत, असे त्यांनी म्हटले. त्यावर पत्रकारांशी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख असणाऱ्या अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली. १९८९ यावर्षी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सैद यांच्या कन्या रूबैया यांचे अपहरण झाले. त्यांच्या सुटकेसाठी काही दहशतवाद्यांना सोडण्यात आले. त्यानंतर १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण झाले. त्यावेळीही काही दहशतवाद्यांना सोडण्यात आले. त्या दहशतवाद्यांना कोणी सोडले? दोन्ही घटनांवेळी दहशतवाद्यांना न सोडण्याची भूमिका मी घेतली होती. त्यावेळी सोडण्यात आलेले दहशतवादीच पाकिस्तानातून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत आहेत, असा दावा अब्दुल्ला यांनी केला.
खरेतर, सर्वांनीच देशाच्या फाळणीवेळी जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स असल्याबद्दल आभार मानायला हवेत. आम्ही नसतो तर जम्मू-काश्मीर मुस्लिमबहुल राज्य असल्याने त्यावेळी पाकिस्तानचा भाग बनू शकले असते. मात्र, आम्ही गांधी-नेहरूंचा मार्ग अवलंबण्याला प्राधान्य दिले. हिंदू, मुस्लिम, शीख किंवा बौद्ध असे सर्वच नागरिक समान मानणाऱ्या भारताचा आम्ही भाग बनलो, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणूक जिंकून जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फन्स-कॉंग्रेस आघाडी सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, एक देश, एक निवडणूक या संकल्पनेला विरोध दर्शवला. ती संकल्पना देशात चालणार नाही, असे त्यांनी म्हटले.





