संगमनेर -तालुक्यात करोनाबाधित रुग्ण आढळण्याची श्रृंखला सलग तेराव्या दिवशीही कायम असून आज शहरातील मदिनानगर परिसरासह तालुक्यातील शेडगाव येथे पहिल्यांदाच संक्रमित रुग्ण आढळून आला आहे. शेडगाव येथून आलेल्या 63 वर्षीय महिलेचे मुंबई कनेक्शन असल्याचे समोर आले. तर संगमनेरमध्ये सापडलेला 65 वर्षीय व्यक्ती घशात त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल झाला होता.आजच्या दिवशी एकूण रुग्णसंख्येत या दोघांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या आता 57 झाली आहे. संगमनेर तालुक्यात सापडलेल्या एकूण रुग्णांत निम्म्याहून अधिक रुग्ण बाहेर गावाहून आलेले आहेत. हा सिलसिला अद्यापही कायम असल्याचे आजही दिसून आले. गेल्या 31 मे रोजी मुंबईतून शेडगाव येथे आलेल्या एका 63 वर्षीय महिलेचा अहवाल आज दुपारी स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाला.त्यात या महिलेला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. ही महिला मुंबईहून परतल्यानंतर बाधित झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरुन येणाऱ्या व्यक्ती बाधित झाल्याची संख्या सोळावर पोहोचली आहे. ही महिला मुंबईतून परतल्यापासून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले गेल्याने त्यांच्याकडून इतरांना संक्रमण होण्याची शक्यता धूसर आहे. संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीलाही करोनाचे संक्रमण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. घशात खवखव होत असल्याच्या कारणावरुन बुधवारी (दि.3) शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. हा रुग्ण आरोग्य तक्रारीवरुन रुग्णालयात दाखल झालेला असल्याने त्याला कोणाकडून संक्रमण झाले. यांसह तो रुग्णालयात येण्यापूर्वी कोणाच्या संपर्कात होता. याचा शोध घेतला जात आहे. सतरा जणांवर उपचार सुरू सध्या संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागात 3 रुग्ण आहेत, रहेमतनगर भागात सात रुग्ण असून त्यातील पाच पूर्णतः बरे झाले आहेत. एकावर उपचार सुरु आहेत तर एकाचा बळी गेला आहे. नायकवाडपुऱ्यात तीन रुग्ण सापडले होते. ते सर्व बरे झाले आहेत. मदिनानगर परिसरात एकूण सहा रुग्ण असून पाच जणांवर उपचार सुरु आहेत, तर एकाचा बळी गेला आहे. भारतनगरमध्ये दोन व कोल्हेवाडी रोड परिसरात 5 अशा सात रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कुरणरोड येथील महिलेने करोनावर मात केल्यानंतर अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला. इस्लामपुरा भागात सापडलेले दोन्ही रुग्ण उपचारानंतर पूर्णतः बरे झाले आहेत तर नवघरगल्लीतील रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत. शहरात आज अखेर एकूण 30 रुग्ण असून त्यातील तेरा जणांनी करोनाचा पराभव केला असून सतरा जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.