हिंगोली (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेले अपघाताचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. प्रत्येक दिवशी किमान दोन ते तीन अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघाताच्या घटनांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर लिंबाळा गावाजवळ दोन वाहनांच्या धडकेत एक महिला ठार झाली तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी ता.२४ रात्री आठ वाजता घडली. शोभा दरक (४५, रा.नांदेड) असे मयत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदेड येथील काहीजण त्यांच्या कारने (एमएच २६-एआर-७०२०) हिंगोली येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. हिंगोली येथे कार्यक्रम आटपून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते परत नांदेडकडे निघाले होते. त्यांची कार हिंगोली ते औंढा मार्गावर लिंबाळा पाटीजवळ आली असताना समोरून वेगात येणाऱ्या जिपने (एमएच ३८-८०७३) त्यांच्या कारला धडक दिली.
या अपघातामध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातामध्ये कारमधील शोभा दरक व अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या.त्यांना तातडीने हिंगोली येथील लक्ष्मी हॉस्पिटल येथे उपचारसाठी दाखल करण्यात आले.मात्र रस्त्यामध्येच शोभा दरक यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
लक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ.अखिल अग्रवाल,डॉ. संदीप इंगळे, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. पंजाब शेळके, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल यांच्या पथकानने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांवर उपचार सुरू केले. त्यापैकी एका महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर.एन.मळघने, जमादार संतोष वाठोरे यांच्या पथकाने भेट दिली आहे.