परळी: राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमधून महायुतीसाठी एक मोठी आणि पहिली सकारात्मक बातमी समोर आली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी परळी नगर परिषदेत महायुतीच्या दोन उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत गुलाल उधळला आहे. यामुळे निवडणुकीआधीच महायुतीचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार रेश्मा बळवंत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर, प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार जयश्री गीते यांनीही बिनविरोध विजय मिळवला आहे. नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नगरसेवकपदाचा हा पहिलाच विजयी निकाल आहे. या बिनविरोध निवडीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.