Allahabad High Court । Cough syrup – प्रतिबंधित कफ सिरपच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन भावांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आरोपींकडून कोणतीही वस्तू जप्त करण्यात आलेली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती करुणेश सिंह पवार यांनी १८ डिसेंबर रोजी विभोर राणा आणि विशाल सिंह यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र जामीन अर्जांवर हा आदेश दिला. प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ५ जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. १३ नोव्हेंबर रोजी फेन्सेडिल कफ सिरपचा साठा वळवल्याच्या आरोपावरून या दोघांना अटक करण्यात आली होती. राज्य सरकारने जामिनाला विरोध केला होता. मात्र, या प्रकरणातील इतर तीन आरोपींना यापूर्वीच जामीन मिळाल्याचा उल्लेख न्यायालयाने केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींची नावे सहआरोपींच्या जबाबांवरून समोर आली असून, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिबंधित वस्तू जप्त झालेली नाही. अंतरिम जामिनाच्या कालावधीत तपासात सहकार्य करण्याचे, गरज भासल्यास तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी भावांना दिले आहेत.