Two Bodies Found In Indrayani – तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरात इंद्रायणी नदीपात्रात दोन अनोळखी महिलांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 29) सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. स्थानिक नागरिकांना नदीपात्रात काहीतरी तरंगताना दिसल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता दोन महिलांचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. विशेष म्हणजे, दोन्ही महिला साडीच्या सहाय्याने एकमेकींना बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या घटनेने अधिकच गूढ निर्माण झाले आहे. मृतांपैकी एका महिलेचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे, तर दुसर्या महिलेचे वय सुमारे 35 वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या महिला माय-लेकी होत्या की नातेवाईक, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, दोघींनी एकत्रितपणे नदीत उडी घेत आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे पाठवले आहेत. दरम्यान, परिसरात कोणी महिला बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याची पडताळणी पोलीस करत असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकारामुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.