आळंदी – कंपनीतील इलेक्ट्रिक मोटारी, डंपर गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना मुद्देमालासह आळंदी पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यांच्याकडून 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित शांताराम जाधव (35, रा. बर्गे वस्ती, चिंबळी) यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये 29 जुलै रोजी फिर्याद दिली होती. विकास गोरख कैतके (वय 24 रा. बर्गे वस्ती, चिंबळी, ता. खेड. मुळ रा. काठवटवाडी, बीड), यश विनोद नवघरे (वय 20, रा. मोरे वस्ती कुरुळी ता. खेड. मुळ रा. गौंडाळा, वाशिम) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंबळी गाव हद्दीतील बर्गे वस्ती येथील इका केमिकल प्रा. लि. कंपनी समोरून फिर्यादींच्या टाटा डंपर गाड्याच्या दोन बॅटऱ्या व इका केमिकल कंपनीतील दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा नोंद करून आळंदी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा तपासासाठी चक्रे फिरवली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पो.ना. सानप, पो.शि. पालवे चिंबळी परीसरात गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना दोन इसम गाड्यांच्या जुन्या बॅटऱ्या चिंबळी फाटा येथे विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती माहिती मिळाली. चिंबळी फाटा ते चिंबळी गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याजवळ दोन इसम गोणीत काहीतरी घेऊन पायी चालत जात असल्याचे दिसले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीचे साहित्य मिळाले. विकास कैतक, विनोद नवघरे अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली. चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. कसून चौकशी केली असता 21 जुलैला मध्यरात्री बर्गेवस्ती परिसरात डंपर गाड्याच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या बॅटरी, मोटारी असा 84 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महानवर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 डाॅ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके, तपास पथकातील स.पो.नि अनिल लोहार, पो.हवा. राजाराम लोणकर, पो.हवा. वहील, पो. हवा. अनिल गोरड, पो.ना. बाजीराव सानप, पो.शि. विकास पालवे, पो.शि. रवि खेडकर, पो.शि. गजानन आढे, पो.शि. अनिल राक्षे, पो.शि. नारायण सुर्यवंशी, पो.शि. रामदास दहिफळे यांच्या पथकाने केली.