पिंपरी | नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी (प्रतिनिधी) – नशेसाठी वापरली जाणारी औषधी इंजेक्शन विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 32 हजार 400 किमतीची मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन जप्त केली आहेत.
सुमित गणेश पिल्ले (वय 32, रा. संत तुकाराम नगर, नेवाळेवस्ती, चिखली आकुर्डीरोड, चिखली), कनिष्कराज ऊर्फ राणा अरुण सुरवसे (वय 21, रा. शरदनगर, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक चिखली परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की,
नेवाळेवस्ती चिखली येथील एच पी पेट्रोलपंपाजवळ दोन इसम दुचाकी मोटार सायकलवर थांबलेले असून त्यांच्याकडे नशेसाठी वापरली जाणारी औषधी इंजेक्शन आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.
दोघांकडून 32 हजार 400 रुपये किमतीची मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन, दोन दुचाकी, दोन मोबाइल फोन असा एकूण दोन लाख 32 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम,
उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, श्रीधन इचके, अजित रुपनवर, प्रमोद गर्जे, तानाजी पानसरे यांनी केली आहे.





