मलकापूरमध्ये मारामारी व दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

कराड – मलकापूर (ता. कराड) येथील बैल बाजार रोडवर मोरया कॉलनी परिसरात सलून व्यावसायिकास दोघांनी मारहाण केली. तसेच आसपासच्या व्यावसायिकांना दुकाने बंद करायला सांगून उभ्या असणाऱ्या रिक्षाच्या काचा फोडून दहशत माजवली. ही घटना सोमवारी रात्री घडली.
याबाबत संतोष भागवत राऊत (वय 37, रा. विश्रामनगर, मलकापूर) यांनी फिर्याद दिली आहे. साहिल आत्तार (रा. म्हसोबा मंदिर, विश्रामनगर) व पप्पू पठाण (रा. शिवाजी चौक, मलकापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुकृपा हेअर ड्रेसेस सलूनच्या दुकानात राऊत काम करत असताना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास साहिल व पप्पू पठाण हे दोघे मोठमोठ्याने ओरडत आले. आम्ही मलकापूरचे भाई आहे, मलकापूरात राहायचे असेल तर तुम्ही सर्वांनी आम्ही म्हणेल तसेच करायचे, तुला आता ठेवत नाही, असे म्हणत फिर्यादीस दुकानातच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
साहिलने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फायटर मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांनी कृष्णात सूर्यवंशी यांच्या रिक्षाची पाठीमागील व पुढील काच फोडून नुकसान केले. आनंदा लाडी यांना तुम्ही तुमचे दुकान बंद करा असे म्हणून शिवीगाळ करून त्यांची पत्नी भारती लाडी व मुलगा सुजल यास मारहाण केली. श्रीराम विष्णू सूर्यवंशी यालाही रस्त्यावर खाली पाडून डोक्यात फायटरने मारून जखमी केले. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.





