सासवड : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच टप्प्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटासाठी अमोल दत्तात्रय कामठे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला. आज एकूण दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये शिवसेनेकडून शिवाजी कामठे यांनी बेलसर पंचायत समितीच्या गणासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वकास, पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य हेच आपले प्रमुख मुद्दे असतील, अशी प्रतिक्रिया अमोल कामठे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिली. दरम्यान, अर्ज विक्रीच्या बाबतीत आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. एकाच दिवसात तब्बल 183 उमेदवारी अर्जांची विक्रमी विक्री झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही संख्या पाहता पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नसून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.एकूणच, उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होताच पुरंदर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून आगामी निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.