एसटी प्रवासात अडीच तोळ्याचे दागिने लंपास

राहुरी : एसटी बसमध्ये प्रवास करत असताना संगमनेर येथील प्रवासी सुवर्णा चंद्रभान शिंदे यांच्या पिशवीमधील २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुवर्णा चंद्रभान शिंदे या संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे राहत आहेत. राहुरी तालुक्यातील विद्यापीठ येथे त्यांचे नातेवाईक आहेत. काही दिवसांपूर्वी सुवर्णा शिंदे या दुपारच्या दरम्यान राहुरी विद्यापीठ येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी संगमनेर येथून एसटी बसमध्ये प्रवास करत होत्या. प्रवासा दरम्यान अज्ञात भामट्यांनी सुवर्णा शिंदे यांच्याकडे असलेल्या पिशवीमधील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असे एकूण २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. सुवर्णा शिंदे या विद्यापीठातील नातेवाईकांच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांनी पिशवी तपासून पाहिली असता पिशवीमधील सोन्याचे दागीने चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काल राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.





